नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर स्थानिक मुस्लीम रहिवासी जमावाने शुक्रवारी दगडफेक केली. या हल्ल्यावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे. गुरुद्वारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ समिती दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने करणार आहे.
जमावाने गुरुद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधित केले. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले.