नवी दिल्ली - पाकिस्तानसोबत भारत चर्चेसाठी तयार असल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी शेजारी राष्ट्राशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, नवी दिल्लीकडून पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या मुद्द्याविषयीची भारताची भूमिका आणखी एकदा स्पष्ट केली. 'भारताला पाकिस्तानसह आपल्या शेजारील देशांबरोबर शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. परंपरेनुसार राजकीय शिष्टाचाराप्रमाणे पाकिस्तानकडून मिळालेल्या शुभेच्छांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रतिक्रियेत विश्वासाचे व दहशतमुक्त वातावरणाचा तसेच हिंसाचारपासून मुक्तीबाबत उल्लेख केला होता,' असे रवीश कुमार यांनी म्हटले.