नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 971 कोरोनाबाधित आढळले असून 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 46 हजार 628 झाला आहे, यात 1 लाख 20 हजार 406 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 1 लाख 19 हजार 293 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 6 हजार 929 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील लॉकडाऊन अधिक शिथिल करण्यात आल्याने कोरोनाच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.