अट्टारी-वाघा -करतारपूर कॉरिडॉरसंदर्भात आज भारत-पाकदरम्यान महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानी अधिकारी अटारी-वाघा सीमेवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय अटारी सीमेवरील इंटिग्रेटेड चेकपोस्टवर (आयसीपी) ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीतील तपशील दुपारी साडेतीन वाजता माध्यमांना देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
करतारपूर कॉरिडॉरसंदर्भात भारत-पाकमध्ये आज बैठक; विना पासपोर्ट प्रवेशाबाबत होणार निर्णय - wagah attari border
हवाई हल्ल्यांवरून दोन्ही देशात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
विना पासपोर्ट करतारपूर साहेब दर्शनाला अनुमती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. हवाई हल्ल्यांवरून दोन्ही देशात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
विदेश मंत्रालयातील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण डेस्कचे संयुक्त सचिव दीपक मित्तल आणि गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव अनिल मलिक या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, तर पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व साउथ एशिया डायरेक्टर जनरल मोहम्मद फैसल करतील. केंद्र सरकारने या बैठकीच्या वार्तांकनासाठी कुठल्याही पाकिस्तानी पत्रकाराला व्हिसा मंजूर केलेला नाही.