नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत, भारताला एका शेजाऱ्याकडून दहशतवादी धोका असल्याचे विधान केले आहे. सीमेवरील आणि एकूणच दहशतवादाविरूद्ध कृती करण्याची भारताच्या एका शेजाऱ्याला आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. आज एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यासोबतच, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, आणि एक दिवस नक्कीच त्यावर भारताचा ताबा असेल असा विश्वासदेखील एस जयशंकर यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वी १०० दिवस पूर्ण झाले. या १०० दिवसांमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, एस. जयशंकर यांनी, या काळात सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी ही राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या लक्ष्यांमधील संबंध मजबूत करणे ही असल्याचे स्पष्ट केले.