नवी दिल्ली - जागतिक उत्पादन परिसंस्थेला या गोष्टीची जाणीव होत आहे, की भारत एक मोठे उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही विशेषतः भारतात गुंतवणूक करण्याकडे मोठ्या कंपन्या भर देत आहेत, असे मत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी व्यक्त केले. ते अनिवासी बिहारी लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते.
प्रसाद यावेळी म्हणाले, की जागतिक उत्पादन परिसंस्था या चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यामध्ये एक विश्वासार्ह पर्याय म्हणून जगभरातील मोठमोठे उत्पादक भारताकडे पाहत आहेत. सॅमसंग कंपनी आतापासूनच भारतात दाखल झाली आहे, आणि त्यांना येथे आपला विस्तारही करायचा आहे. यासोबतच, अॅपल कंपनीचे आठ कारखाने चीनमधून भारतात हलवण्यात आल्याचेही मला समजले आहे.
एक मोठे उत्पादन केंद्र म्हणून देशाची ओळख निर्माण होत आहे - रवीशंकर प्रसाद २०१४ला भाजप सत्तेत आले, तेव्हा देशात केवळ दोन मोबाईल कारखाने होते. सध्या हीच संख्या २५०हून अधिक झाली आहे. आम्ही उत्पादनाशी निगडीत आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले. तसेच, जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांना आम्ही देशात आणले. जेव्हा आम्ही 'आत्मनिर्भर भारत' म्हणतो, तेव्हा आम्हाला जगापासून वेगळा असा भारत अपेक्षित नाही. उलट जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एक महाशक्ती म्हणून उदयास आलेला भारत अपेक्षित आहे.
एप्रिलमध्ये जेव्हा कोरोना महामारी जगात सगळीकडे पसरली होती, तेव्हा मी ही योजना घोषित केली. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. तरीही आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येत्या पाच वर्षांमध्ये या मोबाईल कंपन्या १२ लाख कोटी रुपयांचे मोबाईल आणि अॅक्सेसरीज बनवणार आहेत. यांपैकी सात लाख कोटी रुपयांचे मोबाईल आणि साहित्य हे निर्यात केले जाईल. या माध्यमातून देशात तीन लाख लोकांना प्रत्यक्षरित्या, आणि सुमारे ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होईल.
लडाखमध्ये झालेल्या प्रकारानंतर पंतप्रधान मोदींनी ठामपणे चिनी वस्तूंवर बंदी आणायचे ठरवले. चीनविरुद्ध भारताची ही कारवाई अमेरिका, इंग्लंड, जपान आणि ऑस्ट्रेलिया या सर्व देशांनी उचलून धरली, असेही रविशंकर यावेळी म्हणाले.