नवी दिल्ली : भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आल्याची माहिती समोर येत आहे. ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपले १० जवान बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी)च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सेैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटापट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटापट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले. मागील ४५ वर्षांमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, असेही एका लष्करी सूत्राने स्पष्ट केले.