महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला.. आयटीबीपी प्रमुखांनी घेतला तयारीचा आढावा - भारत- चीन सीमावाद

आयटीबीपी, एसएसबी आणि गृह मंत्रालयातील उच्च पदस्थांमध्ये झालेल्या बैठकीनंतर अधिक तुकड्या सीमेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. लडाख भागात आयटीबीपीचे ५ हजार सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

s s deswal
एस. एस देसवाल

By

Published : Sep 4, 2020, 8:46 PM IST

नवी दिल्ली -गलवान संघर्षानंतर चीनने पुन्हा एकदा सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नियंत्रण रेषेवरील वातावरण तापलेले आहे. लष्करासह निमलष्करी दलाचे जवानही सतर्क झाले आहेत. दरम्यान, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसचे प्रमुख एस. एस देसवाल यांनी सहा दिवसांचा लडाख दौरा केला. चिनी आक्रमणाला परतावून लावण्यासाठी आयटीबीपीच्या सज्जतेची पाहणी देसवाल यांच्याकडून करण्यात आली.

सीमेवरील परिस्थिती पाहता लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांमध्ये समन्वयही साधण्यात येत आहे. २९/३० ऑगस्टच्या रात्री चिनी लष्कराने पँगाँग लेकच्या भागात रात्रीच्या अंधारात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना पुढे येण्यापासून रोखले. तसेच उंचावरील भागात सैन्याला तैनात केले आहे. त्यामुळे भारत या परिसरातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, चुशुल सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करात कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही.

चीनने नियंत्रण रेषेवर आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळेच परिस्थिती चिघळल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. चीनने जबाबदारीनं वागावे, तसेच सर्व द्विपक्षीय करारांचे पालन करावे, अशी विनंती भारताने केली आहे. मागील चार महिन्यांपासून चीनकडून सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारण्यात आले आहे. चर्चेतून काही तोडगा काढण्यासही चीन तयार नाही. गलवान खोऱ्यातील फिंगर ४ ते ८ या भागात चीन कब्जा करून बसला आहे. मात्र, नुकतेच भारतानेही सीमेवरील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर सैन तैनात केले असून त्यामुळे भारतीय लष्कराला फायदा होत आहे. चर्चेतही भारताचं वजन यामुळे वाढणार आहे.

सिक्कीम राज्यात नेपाळ चीन आणि भारताच्या सीमा एकाच ठिकाणी मिळतात. याआधीही डोकलाम येथे भारत चीन वाद झाला होता. आयटीबीपी, एसएसबी आणि गृह मंत्रालयातील उच्च पदस्थांमध्ये झालेल्या बैठकीनंतर अधिक तुकड्या सीमेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. लडाख भागात आयटीबीपीचे ५ हजार सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

नियंत्रण रेषेवर भारताने गस्तही वाढवली आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम येथील भारत चीन सीमेवर जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८० तुकड्या उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यातील नियंत्रण रेषेवर पाठविण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details