नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र संघाने नाराजी व्यक्त केली आहे. भारत, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी 'तत्काळ निर्णय' घ्यावा, असे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांनी संयम राखावा, तणाव कमी करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. दोन्ही देश तयार असतील तर याबाबत आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे गुतारेस यांनी सांगितले आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवालयाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी झालेल्या संमेलनात सांगितले.
याबाबत पाकिस्तानने महासचिवांकडे तणाव कमी करण्यासाठी बैठक घेण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पाऊल उचलायला हवे, असे म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची आम्हाला खूप चिंता वाटत असल्याचे दुजारिक म्हणाले.
संयुक्त राष्ट्राकडे आलेली पत्रे, अहवाल आम्ही तपासले आहेत. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार पाकिस्तानने केलेल्या विनंतीबाबतचे कोणतेही पत्र आम्हाला मिळालेले नाही, असे दुजारिक म्हणाले. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडा पडला आहे.