लडाख - भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान लडाखच्या पूर्वेककडील प्रांतात तणावपूर्ण वातावरण होते. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश करून या ठिकाणी बंकर उभारल्याने दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर ठाकले होते. मात्र वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर, काही भागांतील सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावावर दोन्ही देशांचो एकमत झाले आहे. यामुळे भारत-चीन सीमावाद तात्पुरता निवळल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित घडामोडी सुरू आहेत. सीमावादावरून उभय देशांत अद्याप काही मुद्द्यांवर चर्चा होणे बाकी आहे. पेट्रोलिंग पॉइंट १४, १५ आणि हॉट स्प्रिंग्स या तीन ठिकाणी ही बैठक होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गलवान भागातील लिबरेशन आर्मीने त्यांच्या तुकड्या कॉम्बॅट वेहिकल्ससोबत २.५ किलोमीटर मागे घेतल्या आहेत. तसेच गस्त घालण्यासाठी उभारण्यात आलेला पॉईंट १५ आणि सभोवतालच्या भागातील सैन्य मागे घेण्यात आले आहे. याचसोबत भारतीय सैन्याने देखील ट्रूप्स मागे बोलावले आहेत.
गेल्या ५ मे रोजी जवळपास २५० चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याने भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यात संघर्षाचे वातावरण होते. यानंतर 'ग्लोबल टाइम्स' या चीन सरकारच्या अधिकृत मुखपत्रातून देखील भारसाविरोधात भाष्य करण्यात आले होते. तसेच दोन्ही लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सतत बैठका होत होत्या. यानंतर अखेर संबंधित परिस्थिती तात्पुरती निवळण्याचे चित्र आहे. दोन्ही देशांकडून त्यांचे सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले आहे.