पणजी - गोवा सरकारच्यावतीने पणजीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील चिंबल पठारावर माहिती तंत्रज्ञान (आयटीपार्क) प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, या आयटी पार्कमुळे डोंगराशी असणाऱ्या तळ्यावर भविष्यात विपरीत परिणाम होणार आहे. सरकारने नैसर्गिक संपत्ती वाचवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे, या मागणीसाठी 'सॉलिडिटरी टू सेव्ह चिंबल लेक' संघटनेच्यावतीने आज पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
चिंबल तळे वाचविण्यासाठी चिंबलवासियांचे लाक्षणिक उपोषण - panji
सरकारने नैसर्गिक संपत्ती वाचवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे, या मागणीसाठी 'सॉलिडिटरी टू सेव्ह चिंबल लेक' संघटनेच्यावतीने आज पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आयटीपार्क उभारला तर चिंबल तळे प्रदुषित होईल. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होईल, आंदोलनाचे संयोजक अँनी ग्रासियस यावेळी म्हणाल्या. चिंबल तलाव वाचवण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. चिंबल तलाव आणि सभोवतालच्या निसर्गाचा ऱ्हास वाचविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या तलावात डोंगरावरील पावसाचे पाणी या तलावात साचते. त्यामुळे चिंबल परिसरात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु, विकासाच्या नावावर निसर्ग नष्ट करण्याला विरोध आहे. येथील निसर्ग नष्ट करून आम्हाला विकास नको आहे. सरकारला जर गोव्यात आयटी पार्क आणून गोमंतकीयांना रोजगार देणार असेल, तर प्रथम आयटीचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू केले पाहिजे, असे आवेर्तीन मिरांडा यावेळी म्हणाले.