नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने २८ हजार अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. सैन्यांच्या या हालचालीमुळे राज्यात काहीतरी वेगळे घडणार आहे, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्र्यालयाने उत्तर दिले आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर सैनिकांच्या स्थानामध्ये बदल करण्यात येतो. तसेच सुरक्षेसाठी किती सैन्य तैनात केले आहे, ही माहिती जाहीर केली जात नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लष्कराने १०० तुकड्या (१० हजार सैन्य) जम्मू काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. त्यात वाढ करुन ही संख्या २८० तुकड्या (२८ हजार) करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यता सीआरपीएफ दलाचे जवान आहेत, असे सुत्रांनी सांगितले. सैन्य वाढवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी घरामध्ये अन्न आणि औषधांचा साठा करुन ठेवण्यास सुरुवात केली आहे.