नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्याना आज (मंगळवार) सायंकाळी सात वाजता चर्चेला बोलावले आहे. उद्या केंद्रीय मंत्र्यासोबत शेतकरी नेत्यांची चर्चेची सहावी फेरी आहे. त्याआधी आता अमित शाह शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली असून देशभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. भारत बंदमुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच बाजारापेठांवरही परिणाम झाला आहे.
सायंकाळी सात वाजता बैठक
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत मला अमित शाह यांचा फोन आला होता. त्यांनी आमच्या सोबत बैठक बोलावली आहे. सायंकाळी सात वाजता आम्ही बैठकीसाठी गृहमंत्र्यांकडे जाणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले.
पंजाब, हरयाणा आणि उत्तरप्रदेशात जास्त परिणाम
मुख्यता पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी चक्का जाम करत महत्त्वाचे रस्ते सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात बंद केले. दुकाने आणि बाजारपेठाही बंद आहेत. अनेक राज्यात वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पंजाब, हरयाणा आणि दिल्ली राज्यात झाला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे अडवल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १३वा दिवस आहे. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आलेला नाही. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.