नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी आज राज्यसभेमध्ये काश्मीरचा लेखाजोखा मांडला. यावेळी बोलताना त्यांनी सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगितले, तर काही बाबींवर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आक्षेप घेतला असता, आपण सांगत असलेल्या आकड्यांना चूक सिद्ध करण्याचे आव्हान शाहंनी आझाद यांना दिले.
काश्मीरमधील इंटरनेट सेवेबाबत बोलताना शाह म्हणाले, की काश्मीर प्रांतात पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे. तेव्हा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. पुढे बोलताना, जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मोबाईल-मेडिसिन व्हॅन्सही तैनात करण्यात आल्या आहेत असे सांगत शाहंनी वैद्यकीय सुविधांबाबत माहिती दिली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी आणि तांदूळ याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यावर्षी २२ लाख मेट्रिक टन सफरचंद तयार होण्याची शक्यता आहे.