पानिपत(हरयाणा) - राजधानी दिल्लीपासून ९० किलोमीटरवर वसलेले पानिपत हे एक ऐतिहासिक शहर आहे. शहर इतिहासातील कित्येक मोठ्या युद्धांचे साक्षीदार राहिले आहे. पानिपतमध्ये झालेल्या बाबर, हुमायूं आणि इब्राहिम लोधी या योद्ध्यांच्या लढायांनी देशाचा इतिहास बदलला. येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तू आजही पानिपतच्या महान इतिहासाची कथा सांगतात. खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेले हे शहर आता वेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. पानिपत हा जिल्हा टेक्स्टाइल हब झाला असून दरवर्षी जगभरात तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांच्या हँडलूम वस्तूंची निर्यात केली जाते.
पानिपत रिसायकल्ड सूतासाठी प्रसिद्ध -
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इथे मोठ्या प्रमाणात हँडलूमचे काम चालते. येथे बनलेले ब्लँकेट जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, आता पानिपत रिसायकल्ड सूतासाठीही विश्वस्तरीय ओळख निर्माण करत आहे. १९८७मध्ये खुल्या बाजारपेठेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत जगभरात पानिपतहून सूत निर्यात केले जाते आणि आता परिस्थिती अशी आहे की, सूत रिसायकल करण्यात पानिपत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
सूताची निर्यात -
पानिपतचे सूत जगभरात पाठवले जाते. श्रीलंका, नेपाळ, रशिया, अमेरिका, जर्मनी, टर्की, नेदरलँड, फिनलँड, फ्रांस, बल्जेरिया आणि बेल्जियम या देशांमध्ये याला सर्वाधिक मागणी आहे. पानिपतमध्ये जवळपास ४०० स्पिनिंग मिल्स दिवसाला २० हजार किलो सूत बनवतात. येथील स्पिनिंग मिलमध्ये प्रामुख्याने कॉटन आणि पॉलिस्टर सूत तयार केले जाते. याचा २० टक्के उपयोग पानिपतच्या इंडस्ट्रीतच केला जातो. या धाग्यांपासून पायपुसणी, कॅनव्हास, पडदे, चादर, फर्निचर फॅब्रिक आणि हजारो प्रकारच्या टेक्सटाइल वस्तू बनवल्या जातात.