नवी दिल्ली -हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज(गुरुवार) राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पीडित कुटुंबाची भेट घेऊ दिली नाही. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. तसेच त्यांना ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी कोणत्याही राजकीय नेत्यास हाथरसला पोहचू दिले नाही. आता पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.
पोलिसांनी हाथरस जिल्ह्याच्या सर्व सीमांवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोणत्याही नेत्याला जिल्ह्यात पोलीस प्रवेश देत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. नेते, कार्यकर्ते आणि कोणत्याही संघटनेलाही हाथरसमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.
यमुना एक्सप्रेस हायवेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला. त्यानंतर राहुल गांधी पायीच महामार्गाने निघाले. महामार्गावरील झिरो पॉईन्टवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. दुपारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची देखील झाली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आता नोयडावरून उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
साथीचा आजार कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पुढे जाऊ न देता इथेच थांबवले, असे हाथरसचे अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त रणविजय सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.