महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळमध्ये गोळ्या घालून ठार मारलेली टी -१ वाघीण नरभक्षक नव्हती, याचिकाकर्त्याचा न्यायालयात दावा

By

Published : Feb 10, 2021, 12:46 PM IST

Updated : Feb 10, 2021, 1:54 PM IST

१३ जणांना ठार मारल्याचे समोर आल्यानंतर दोन बछड्यांची आई असलेल्या टी -१ वाघीणीला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाघीणीला ठार मारल्यानंतर सबंध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. हे प्रकरण बरेच गाजले होते.

टी -१ वाघीण
टी -१ वाघीण

नवी दिल्ली - यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या टी-१ उर्फ अवनी वाघीणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. १३ जणांना ठार मारल्याचे समोर आल्यानंतर दोन बछड्यांची आई असलेल्या वाघीणीला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाघीणीला ठार मारल्यानंतर सबंध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. हे प्रकरण बरेच गाजले होते. ही वाघीण खरेच नरभक्षक होती की नव्हती, यावर एकमत नव्हते. संगिता डोग्रा या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

पोटात मानवी नखे, केस सापडले नाहीत -

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. टी-१ वाघीण नरभक्षक नसल्याचे शवविच्छेदन अहवालात सिद्ध झाल्याचा दावा याचिकाकर्त्या संगिता डोग्रा यांनी केला. वाघीण नरभक्षक होती किंवा नव्हती हे शवविच्छेदन अहवालातून कसे समजले? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला विचारला. यावर डोग्रा म्हणाल्या की, जर वाघीण नरभक्षक असती तर तिच्या पोटात मानवी नखे आणि केस आढळून आले असते. पण शवविच्छेदन अहवालात असे काहीही आढळून आले नाही. या वाघीणीच्या पोट रिकामे होते.

आपला दावा सिद्ध करण्यासाठी संगिता डोग्रा यांनी माध्यमात आलेल्या वृत्तांचा हवाला दिला. आम्ही माध्यमातील वृत्तांवर अवलंबून नसल्याचे सरन्यायधीश म्हणाले. पुढे न्यायालयात युक्तीवाद करताना डोग्रा म्हणाल्या की, ठार मारण्यात आलेल्या वाघीणीच्या पोटात फक्त द्रव पदार्थ आणि वायू होता. जर ती नरभक्षक असती तर पोटात नखे, मांस आणि केस असते. जर मांस पोटात असते तर त्याचे पचन झाले असते, ते पोटात कसे आढळून येईल, असा प्रतिप्रश्न सरन्यायाधीश बोबडे यांनी केला.

नरभक्षक होती की नव्हती, हे जाणून घेण्यास प्राधान्य

सरन्यायाधीश एस. ए बोबडे यांनी याचिकाकर्त्याचा युक्तीवाद ऐकून घेतला. टी-१ वाघीण नरभक्षक होती की नव्हती, हे जाणून घेण्यास आमचे प्राधान्य आहे. या सबंधिचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करा, असे सरन्यायाधिशांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली.

यवतमाळ जिल्ह्यात १३ व्यक्तींचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रात टी 1 वाघीणीला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्ह्यात टी 1 वाघीणीचे चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात 13 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघीणीला पकडण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने अखेर मनुष्यहानी टाळण्यासाठी तिला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश तत्कालीन वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक ए के मिश्रा यांनी 4 सप्टेंबर 2018 रोजी दिले होते.

हैदराबादवरून शूटर बोलवण्यात आला होता

नरभक्षक टी वन वाघीणीला ठार मारल्याने देशभर वादंग झाला होता. हैदराबादमधील शूटर नवाब पितापुत्रांवर वाघीणीला ठार मारण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, यवतमाळच्या ज्या गावांमध्ये वाघीणीची दहशत होती, त्या ग्रामस्थांनी शूटर नवाब पिता-पुत्र आणि त्यांच्या टीमचे आभार मानले होते. शूटर नवाबच्या पथकाने परिसरात मुक्काम ठोकून टी-वन वाघीणीचा बंदोबस्त केल्यामुळे सत्काराचे आयोजन केले होते.

कधी मारले ठार ?

2 नोव्हेंबर 2018 रोजी अवनीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. अवनीला ठार करणे किंवा बेशुद्ध करणे हे पर्याय होते. मृत्यूनंतर केंद्र सरकारने एनटीसीएच्या माध्यमातून वन विभागाच्या तीन सदस्य अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती स्थापन केली होती. या प्रकरणात एनटीसीएच्या दिशानिर्देश तसेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972, आर्म ऍक्ट 1961 च्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे पुढे आले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दिलेल्या शपथपत्रात यासंबंधी अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला असल्याचेसुद्धा बोलले जात होते.

टी 1 वाघीणीला ठार मारताना दोन पिल्लांना पकडून वाचावे असे निर्देश होते. यात अवनीला पकडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. अखेर पकडण्यात अपयश आल्याने ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. नागपूर खंडपीठाकडे एनटीसीएने ठार मारताना काही सूचना करत एसओपी वन विभागाला देण्यात आली होती.

Last Updated : Feb 10, 2021, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details