नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) आपल्या 69 वा वाढदिवसाच्या निमित्ताने गुजरातमधील नमामि देवी नर्मदा महोत्सव अंतर्गत सरदार सरोवरला भेट देणार आहेत. तिथे त्यांच्या हस्ते नर्मदा नदीची महाआरती करण्यात येईल. त्याच्या आधी ते त्यांच्या आई हीराबेन यांचा आशीर्वाद घेतील.
सरदार सरोवर यावर्षी पहिल्यांदा 138 मीटर 68 इंच इतके भरले आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 साली पदभार स्विकारल्यानंतर 17 दिवसाच्या आत सरोवराला दरवाजे लावण्यासाठी मंजुरी दिली होती. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरोवराच्या बांधाची उंची वाढवण्यासाठी 51 तासांचा उपवासही केला होता. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि नितिन पटेल यांनी नर्मदा जलच्या स्वागतासाठी राज्यात नमामि देवी नर्मदे महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सरदार सरोवर येथील नर्मदा बांध येथे होणार आहे.
नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, केवडिया मध्ये सरोवरस्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी एका सभेलाही संबोधित करणार आहे. यासाठी 10 हजार लोक उपस्थित राहू शकतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सभामंडप तयार करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले, पंतप्रधान मोदी आपल्या भाषणानंतर स्टेच्यू ऑफ यूनिटी जवळ सुरू असलेल्या विकास योजनांचे निरीक्षण करतील.