नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेतील १९ वर्षीय पीडितेचा काल (मंगळवार) सकाळी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस नेते उदित राज पत्रकार परिषदेत बोलताना 'जेव्हाही भाजपा सत्तेत येते, तेव्हा दलितांचे शोषण होते. दलितांच्या शिक्षण आणि रोजगारावरही परिणाम होतो. भाजपा दलितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हीच भाजपाची विचारधारा असल्याने अशा घटना पुन्हापुन्हा राज्यात घडत आहेत', असे काँग्रेस नेते उदित राज म्हणाले.
उत्तर प्रदेश महिला काँग्रेस आघाडीनेही योगी सरकारवर जोरदार टीका केली. महिला आघाडीच्या प्रमुख सुश्मिता देवी म्हणाल्या, 'फक्त गुन्हेगारांची नाही तर सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही चौकशी करा. ज्या पद्धतीने पीडीतीचा मृतदेह जाळण्यात आला, हे मानवी हक्कांचे मोठे उल्लंघन आहे. गुन्हा घडल्यानंतर पहिले आठ दिवस तक्रार दाखल करण्यात आली नाही. नंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बलात्काराच्या आरोपाचा समावेश नव्हता'.
१९ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना घरात डांबून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीसही टीकेचे धनी बनले आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.