चंदीगड- हरियाणा विधानसभेसाठी राज्यभरामध्ये आज (सोमवारी) सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी एकूण १ हजार १६९ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. यामध्ये १ हजार ६४ पुरुष आणि १०५ महिला उभ्या आहेत.
LIVE UPDATE:
हरियाणामध्ये 5:30 वाजेपर्यंत 61.29 टक्के मतदान
हरियाणामध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 50.59 टक्के मतदान
हरियाणामध्ये दुपारी २ वाजपर्यंत ३७.१२ टक्के मतदान
उचान कला येथे जेजेपी पक्षाचे उमेदवार दुष्यंत चौटाला यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला. त्यावरून बीजेपी आणि जेजेपी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलीस अधिक्षक घटनास्थळी उपस्थित असून निमलष्करी दलही पाचारण करण्यात आले आहे.
दादरी विधानसभा मतदारसंघातील दातौली गावातील लोकांनी पाण्याच्या समस्येमुळे निवडणुकीवर बहिष्कार घातला. प्रशासनाचं आमच्याकडे लक्ष नसल्याचं म्हणत पैतावार गावानेही निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
नूह: हरियाणातील फिरोजपूर झिरका विधानसभा मतदारसंघातील मलहाका गावामध्ये काँग्रेस आणि भाजप समर्थकामध्ये तुंबळ हाणामारी. १२८ नंबरच्या बूथवर लाठी काठ्यांनी हाणामारी, अनेकजण जखमी झाल्याची माहिती. यावेळी गोळीबार झाल्याचीही माहिती मिळत आहे.
ईव्हीएममधून मिळणारं प्रत्येक मत भाजपचं, असे भाजपचे उमेदवार बक्षिस सिंह म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. व्हिडिओ बनावट असल्याचा बक्षिस सिंह यांनी म्हटले आहे.
माजी हॉकी कप्तान संदीप सिंह यांनी कुरुक्षेत्र येथे मतदान केले. संदीप सिंह पिहोवा येथून भाजपच्या तिकीटावर उभे आहेत.
उचाना कला मतदार संघातून उभ्या असेलल्या भाजपच्या उमेदवार प्रेमलता सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क. तुमच्या परिसराच्या विकासासाठी मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन केले.
जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला ट्रक्टरमध्ये बसून सहकुटुंब सिरसा येथे मतदानाला आले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.०० वाजेपर्यंत २२.३८ टक्के मतदान झाले.