पणजी- गोव्याची राजधानी पणजीतील आझाद मैदानावर आज धुमधडाक्यात धुलीवंदन आणि गुलालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पणजी शिगमोत्सव समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्थानिकांबरोबर विदेशी पर्यटकांनी सहभागी होत धुळवड साजरी केली.
या गुलालोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक राजकारण्यांसह सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत गीत आणि नृत्याचा आनंद घेत असतात. आज सकाळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत या उत्सवाला सुरुवात झाली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या गुलालोत्सवात लोक एकमेकांना रंग लावत संगीताच्या तालावर ठेका धरताना दिसले. यामध्ये विदेशी पर्यटकही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार मोन्सेरात म्हणाले, लोकांनी शांततेत होळी सणाचा आनंद घ्यावा. गोव्याला सांस्कृतिक एकतेची परंपरा आहे. त्यामुळे यामध्ये सर्वधर्मीय मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसतात. अशावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येते. कारण ते न चुकता या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात.