नवी दिल्ली- देशातील २१ विमानतळांवर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांची कोरोनासाठी तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. सरकार हे कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी कार्यरत आहे. तसेच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच नेपाळ, भूतान आणि म्यानमारहून येणाऱ्या साधारणपणे दहा लाख नागरिकांचीही तपासणी करण्यात आल्याचे जावडेकरांनी सांगितले. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी अशा विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी पुण्यातील एकमेव संस्था उपलब्ध होती. मात्र, सरकारने आता देशात अशा १५ प्रयोगशाळा उभारल्या असून, आणखी १९ केंद्रे सुरू करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.