महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प ठरतोय भारतीय विद्युत ऊर्जा इतिहासाचा गौरवशाली वारसा - गलोगी विद्युत प्रकल्प

हा देशातला सर्वांत जुना विद्युत प्रकल्प आहे, ज्याच्या प्रकाशानं आजही डेहराडून आणि मसूरी उजळून जातायत. मसूरीमध्ये या प्रकल्पासाठी 1890 च्या दशकातच काम सुरू झालं होतं. इंग्रजांनी भारतातल्या विद्युत प्रकल्पासाठी सर्वांत आधी मसूरीची निवड केली आणि गलोगी प्रकल्प त्या इतिहासाची आजही साक्ष देतोय.

ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प मसूरी
ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प मसूरी

By

Published : Sep 12, 2020, 6:03 AM IST

सध्याच्या आधुनिकतेच्या युगात ना गांधीजींचे विचार बदलले ना गांधीजींचा चरखा बदलला. बदललेत ते फक्त विकासाचे आयाम. देशात विकासाचे असे अनेक स्तंभ आहेत, जे इंग्रजांच्या काळात उभारले गेले. ते आजही भूतकाळाची साक्ष देतायत.

इंग्रजांच्या सत्तेत जेव्हा अनेक महानगरांमध्ये वीज पोहोचली नव्हती, तेव्हा डेहराडून आणि गिरीराजांची राणी म्हणवल्या जाणाऱ्या मसूरीला उजळवून टाकण्यासाठी 'गलोगी विद्युत प्रकल्पा'ची सुरुवात झाली.

हा देशातला सर्वांत जुना विद्युत प्रकल्प आहे, ज्याच्या प्रकाशानं आजही डेहराडून आणि मसूरी उजळून जातायत. मसूरीमध्ये या प्रकल्पासाठी 1890 च्या दशकातच काम सुरू झालं होतं. इंग्रजांनी भारतातल्या विद्युत प्रकल्पासाठी सर्वांत आधी मसूरीची निवड केली आणि गलोगी प्रकल्प त्या इतिहासाची आजही साक्ष देतोय.

देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षं झालीत मात्र, आधुनिक भारतात अशी अनेक ठिकाणंयत, जिथं आजही घरांमध्ये वीज नाही. तर, मसूरीतल्या गलोगी पॉवर हाउसने त्या काळात विकासाला चालना दिली जेव्हा देश गुलामगिरीत होता.

सर्वांत प्रथम मोठे जनरेटर आणि संयंत्रं डून पर्वतराजीच्या गढ़ीडाकरा प्रदेशात एक कच्चा रस्ता तयार करून बैलगाडीतून गलोगीपर्यंत पोहेचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प मसूरी

1900 साली पहिल्यांदा डेहराडूनला पोचलेल्या रेल्वेनं या प्रकल्पाला गती देण्यात सर्वांत मोठी भूमिका बजावली होती. यानंतर इंग्लंडहून जहाजांमधून मुंबईला पोचलेल्या अवजड मशिनरी आणि टर्बाइन्स डेहराडूनला पोहोचवण्यात आली. नंतर बैलगाड्या आणि कामगारांच्या खांद्यांवरून गलोगी जल विद्युत गृहात शेकडो फूट खाली पर्वतांमध्ये ही यंत्रं प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यात आली.

अखेर 1907 मध्ये क्यारकुली आणि भट्टामध्ये बनवलेल्या छोट्या तलावांमधून 16 इंचाच्या पाइपलाइनने पोचलेल्या जलधारांनी इंग्लंडमधून आणलेल्या विशालकाय टर्बाइन मशिनरी चालवण्यास सुरुवात केली आणि मसूरी-डेहराडूनच्या लोकांच्या घरांमध्ये पहिल्यांदा विजेचा बल्ब लागला.

ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प मसूरी

⦁ 9 नोव्हेंबर 1912 मध्ये गलोगी विद्युत गृहानं देशातलं दुसरे विद्युतगृह म्हणून मान्यता मिळवली.

⦁ 1920 पर्यंत मसूरीच्या बहुतेक बंगले, हॉटेल आणि शाळांमधून पारंपरिक दिवे जाऊन त्यांची जागा विजेच्या चकाकणाऱ्या बल्बनी घेतली होती.

⦁ हळू-हळू मसूरीच्या लंढौर आणि डेहराडूनचं विद्युतीकरण झालं.

⦁ मसूरी पालिकेकडं तब्बल 70 वर्षं गलोगी विद्युत गृहाचं स्वामित्व होतं.

⦁ मसूरी, डेहराडून शहरांत विजेच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं एकेकाळी मसूरी नगरपालिका उत्तर प्रदेशतली सर्वांत श्रीमंत नगरपालिका मानली जात असे.

⦁ 1976 मध्ये उत्तर प्रदेश विद्युत परिषदेनं विद्युत गृहासह पालिकेकडील सर्व विद्युत उपक्रम अधिग्रहित केले.

मागच्या 35 वर्षांमध्ये या जलविद्युत गृहानं अनेक उतार-चढाव पाहिलेत. मागील काही दशकांत जुने तंत्रज्ञ कर्मचारी एकामागोमाग एक सेवानिवृत्त झाले, ज्यांना जुन्या गलोगी विद्युत गृहाला इंग्लंडनिर्मित टर्बाइन आणि यंत्रांना चालवण्याचं, बिघाड झाल्यास त्यांच्या दुरुस्तीचं ज्ञान होतं. या विद्युत गृहातल्या मूळ परदेशी यंत्रांचे भाग जुन्या काळात तेव्हाच्या तंत्रज्ञानानुसार बनवले गेले असून आता ते नवीन तयार होणं बंद झालंय.

राज्याच्या निर्मितीनंतर याचं नियंत्रण उत्तराखंड जलविद्युत मंडळाकडं सोपवलं गेलं. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आणि नव्या पिढीला याविषयी माहिती देण्याची गरज आहे. गलोगी विद्युत गृह भारतीय विद्युत ऊर्जा इतिहासाचा आणि राज्याचा गौरवशाली वारसा आहे.य. 113 वर्षं जुन्या गलोगी विद्युत गृहाला तांत्रिक इतिहासात गौरवशाली वारशाचा दर्जा देऊन त्याचं महत्त्व कायम ठेवण्याचं आणि त्याच्या नूतनीकरण, आधुनिकरणाचं कार्य सुरू आहे. गलोगी विद्युत गृह भारतीय विद्युत ऊर्जा इतिहासाचा आणि राज्याचा गौरवशाली वारसा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details