ग्वाल्हेर - मध्य प्रदेशात ग्वाल्हेर शहरात झाशी रोड परिसरात पोलिसांनी पाळीव कोंबड्यांना मारल्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. प्रकरण विचित्र वाटत असले तरी, कोंबड्या पाळणाऱ्या महिलेने शेजाऱ्यांवर या कोंबड्यांना विष घालून मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी 'कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या' केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
भांडण झाल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी विषारी धान्य खायला घालून जाणूनबजून या कोंबड्यांना मारले असल्याचे या महिलेने म्हटले आहे. पोलिसांना या महिलेचे म्हणणे योग्य वाटल्याने तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
कोंबड्यांच्या कुटुंबाची हत्या झाशी रोड परिसरातील वैष्णो देवी मंदिराजवळ ही गरीब महिला राहते. तिने तिच्या उदरनिर्वाहासाठी काही कोंबड्या आणि कोंबडे पाळले आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या शेजारी राहणाऱ्या २ तरुणांनी तिच्याकडे कोंबड्यांच्या पिल्लांची मागणी केली होती. सुमेर सिंह प्रजापति आणि सुरेंद्र खटीक अशी या तरुणांची नावे आहेत. संबंधित महिलेने कोंबडे किंवा कोंबड्यांची पिल्ले देण्यास साफ नकार दिला होता. या कारणाने तिचे या दोघांशी भांडण झाले होते. या तरुणांनी या रागातून ३ दिवसांपूर्वी महिलेच्या ८ कोंबड्यांसमोर विष मिसळलेले धान्य टाकले होते. विषारी धान्य खाल्ल्याने यातील ५ कोंबडे-कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर, इतरही आजारी आहेत, अशी माहिती या महिलेने दिली आहे.
पोलिसांनी या प्रकार सुरुवातीला फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. मात्र, या महिलेने पुरावा दाखवल्यानंतर मेलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर तक्रार दाखल केली आहे. या आरोपींचा शोध सुरू आहे.