नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात चौघांना फाशी देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंगची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुन्हा घडला तेव्हा दिल्लीत नसल्याचा दावा मुकेशने केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंबधीची याचिका आधीच फेटाळली आहे. त्याला मुकेशने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
तर अक्षय या अन्य दोषीने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याबद्दल न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोनदा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. दोन्ही वेळेस याचिका फेटाळण्यात आली. मग कशाच्या आधारे पुनर्विचार करायचा, असा सवाल सर्वोच्च न्यायलयाने केला.
अल्पवयीन असल्याची फेरयाचिका दोषी पवन गुप्ताने केली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. तर पवन आणि अक्षने दुसऱ्यांदा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तोही राष्ट्रपतींनी फेटाळला आहे. त्यामुळे दोषींना आता उद्या फाशी होणार हे निश्चित झाले आहे.