भोपाळ - भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात माजी सैनिकांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी दिलेल्या वदग्रस्त विधानावर हे सैनिक नाराज आहेत. त्यावरून रविवारी त्यांनी भोपाळ येथे रस्त्यावर उतरून निदर्शन केले. यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
मालेगाव विस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळ येथून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल माजी सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. आज भोपाळ येथे रस्त्यावर उतरून त्यांनी ठाकूर यांच्या विरोधात निदर्शन केले.
प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात निदर्शने करताना माजी सैनिक
सैनिकांच्या नावाचा राजकारण्यांनी उपयोग करू नये, अशी विनंतीही त्यांनी या विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून केली. पंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांना आपली सेना म्हणून संबोधतात हेही चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. जर हे सैनिक मोदींचे असते तर सातवा वेतन आयोग लागू करताना सैनिक आणि अधिकाऱ्यांना एकच आयोग लागू केला असता. मात्र, मैदानात लढणाऱ्या आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी भेद केला, असा आरोपही त्यांनी यावेळी लावला.
दिग्विजय सिंहानाही फटकारले -
रस्त्यावर निदर्शन करत या सैनिकांनी भोपाळचे काँग्रेस कार्यालयही गाठले होते. दिग्विजय सिंहांना भेटून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सैनिकांच्या नावाचा वापर आपल्या भाषणात वापरू नये, असे निवेदन केले आहे. दिग्विजय सिंहांनी एका भाषणात सैनिकांच्या नावाचा उपयोग केल्यावरून त्यांनी यावेळी आक्षेप नोंदवला.