महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बेपत्ता 'एएन-३२' विमानाची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षिस, हवाई दलाची घोषणा

विमानाची विश्वसनीय माहिती देण्यासाठी हवाई दलाने संपर्क साधण्यासाठी ९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या क्रमांकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

बेपत्ता 'एएन-३२'

By

Published : Jun 9, 2019, 11:26 AM IST

इटानगर- भारतीय हवाई दलाचे बेपत्ता असलेल्या एएन-३२ विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे विमान बेपत्ता होऊन आज ६ दिवस झाले आहे. या विमानातून १३ जण प्रवास करत होते.

भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ हे विमान शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या आहे. त्यामुळे हवाई दलाने हा निर्णय घेतला आहे. खराब हवामान असूनही या अपघाताच्या ६ व्या दिवशीही शोधमोहीम सुरूच होती. मात्र, विमानाचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे आता या विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५ लाखांचे बक्षिस देणार असल्याची घोषणा हवाई दलातर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती कमांडिंग इन चीफ एअर मार्शल आर. डी. माथुर यांनी दिली.

विमानाची विश्वसनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला ५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. यासाठी हवाई दलाने संपर्क साधण्यासाठी ९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या क्रमांकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस धनोआ यांनी शनिवारी जोरहाट दौरा केला होता. धनोआ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या विमानात प्रवास करत असलेल्या हवाई दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.

हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले, की या शोधमोहिमेत इस्रोच्या उपग्रहांसह इतर सर्व महत्वाच्या संस्था यासाठी काम करत आहे. त्यासाठी अधिकाधीक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय सेना आणि भारत-तीबेट सीमा पोलीसांच्या तुकड्या या शोधमोहीमेत सहभागी झाल्या आहेत. हवाई दलाचे आणखी हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमाने वापरण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शोधमोहीम क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. याशिवाय हवाई सेंसर आणि उपग्रह एकत्रित करुन त्याचा डेटा आणि फोटोंचे विश्लेषण करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details