पाटणा - धमदाहा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उमेदवार रमेश कुशवाहा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आरएलएसपी पक्षाच्या पूर्णिया येथील कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला. सदैवाने कुशवाहा या हल्ल्यातून बचावले आहेत. विरोधकांपैकीच कुणीतरी आपल्यावर हल्ला केल्याचे कुशवाहा यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय लोक समता पार्टीच्या विधानसभा उमेदवार रमेश कुशवाहा यांच्यावर गोळीबार झाला काल रात्री मीरगंज पंचायतीतून मतदारांना भेटून कुशवाहा धमदाहाला परत जात होते. दोन दुचाकी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या चालकाला वाहन पूर्णियातील आरएलएसपी कार्यालयाकडे घेण्यास सांगितली. पूर्णिया कार्यालयाच्या आत प्रवेश करत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
पोलिसांनी सुरू केला तपास -
कुशवाहा यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले. ते गेल्यानंतर लगेचच कुशवाहा यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळा भेट देत तपास सुरू केला आहे. निवडणुकीत माझे पारडे जड असल्याने विरोधकांपैकी कुणीतरी आपल्यावर हल्ला केल्याचा संशय कुशवाहा यांनी व्यक्त केला आहे.
'MY' समीकरणाची आहे ही जागा -
धमदाहा विधानसभा मतदारसंघ मुस्लिम आणि यादव बहुल भाग आहे. यामुळे याला M-Y फॅक्टरची जागा मानले जाते. येथे काँग्रेस आणि आरजेडीची चांगली पकड आहे. सध्या येथे जदयूचा उमेदवार आहे. मात्र, यावेळी या समीकरणात बदल होऊ शकतो कारण यावेळी भाजपा आणि जदयू एकत्र निवडणूक लढत आहेत.