डेहराडून - देशभरामध्ये कांद्याच्या वाढत्या किमतीने नागरिकांना रडवले आहे. उत्तराखंडमध्ये स्वस्तात कांदे वाटप सुरू असताना एका तरुणाने कहरच केला. कांदे न मिळाल्याने रागाच्याभरात एका तरुणाने कांदे वाटप करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याचे बोट दातानं चावत हातावेगळे केले. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तरुणाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.
हेही वाचा -'मी आणि माझं कुटुंब कांदा खातच नाही...' कांदा दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं अजब उत्तर
ही घटना राज्यातील हल्दानी शहरातील तिकोणीया भागामध्ये घडली. कांद्याच्या वाढत्या किमंतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना कांदे विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वस्तात कांदे देण्यासाठी स्टॉल सुरू केला होता. यावेळी स्वस्तात कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. एक तरुणही कांदे घेण्यासाठी आला होता. मात्र, त्याला कांदे मिळाले नाही. त्यामुळे त्याला राग अनावर झाला. तसेच त्याने काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर भांडण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा -काद्यांने केला वांदा...ग्राहकांच्या खिशांना लावली कात्री
भांडणामध्ये तरुणाने काँग्रेस कार्यकर्त्याचे बोट आपल्या दातांनी चावले. यामध्ये कांदा वाटप करणाऱ्या कार्यकर्त्याचे बोट तुटून पडले. त्यानंतर इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या तरुणाची चांगलीच धुलाई केली. हा तरुण भाजपचा असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, कांद्यावरून मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या तरुणाची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून पोलीस ठाण्यात घेऊन नेले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी भोटिया पडाव प्रताप सिंग यांनी सांगितले. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.