नवी दिल्ली - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच असून सुमारे दीड महिन्यापासून शेतकरी सीमेवर आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. त्याची रंगीत तालीम आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर केली.
महामार्गावर शेतकऱ्यांकडून शक्तीप्रदर्शन -
शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेवून महामार्गावर पोहचले होते. त्यामुळे दिल्लीला जोडणाऱ्या अनेक महामार्गांवरी टोल नाक्यावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. आंदोलकांना दिल्लीत आत येऊ दिले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
२६ जानेवारीला निघणार रॅली-
२६ जानेवारीला विशाल ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आणि सरकारमधील चर्चा अद्यापही सुरू असून तोडगा निघाला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून सरकार कायदे रद्द करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर केल्या जातील असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले आहे. मात्र, कायदे रद्द केल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
किसान रॅलीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत सहभागी झाले होते. गाझीपूर सीमेवरून त्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली. आत्ता काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली फक्त ट्रेलर असून खरी परेड तर २६ जानेवारीला पाहायला मिळेल, असे टिकैत यांनी म्हटले.