अनंतपूर (आंध्र प्रदेश) - शाकाहारी बिर्याणीमध्ये पाल असल्याच्या बहाण्याने एकाने कँटीन चालकाकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात घडला आहे. सुंदर पाल नामक व्यक्तीने गुंटकल्लू रेल्वे स्थानकावर शाकाहारी बिर्याणी मागवली. अर्धी बिर्याणी संपल्यावर या व्यक्तीने अचानक स्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात करून आपल्या अन्नात पाल असल्याचे अधिकाऱ्यांना पटवून दिले. तसेच आजारी पडल्याचे नाटक करत कँटीन चालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
बिर्याणीत पाल सापडल्याच्या बहाण्याने फसवणूक; आरोपीस अटक - आंध्रप्रदेश
शाकाहारी बिर्याणीमध्ये पाल असल्याच्या बहाण्याने एकाने कँटीन चालकाकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशातील आनंतपूर जिल्ह्यात घडला आहे. सुंदर पाल नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
कँटीन मालकाने हा प्रकार मिटवण्यासाठी या व्यक्तीस ५००० रू देण्याचे कबूल केले. त्याचवेळी एका रेल्वे कर्मचाऱ्याने या व्यक्तीची सोशल मीडियावरील एक पोस्ट दाखवली. संबंधित पोस्टमध्ये याच व्यक्तीने आधी जबलपूर रेल्वे स्थानकावर सामोस्यात पाल आढळल्याचा दावा केला होता. यावेळीही सुंदर पाल याने तेथील कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. थोड्याच वेळात पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस चौकशीनंतर त्याने कँटीन मालकाला अन्नात पाल सापडल्याचा खोटा बहाणा करून फसवल्याचे मान्य केले. तसेच बिर्याणीत पाल म्हणून माशाचा तुकडा टाकल्याचे सांगितले. सुंदर पाल हा मुंबईचा रहिवासी आहे. सध्या पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.