नवी दिल्ली -भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (ईएएम) आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेतली. यात भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध, कोरोनाविरोधात उपाययोजना, भागीदारी या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. तसेच काही महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आली.
भारताने 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यापैकी 400 दशलक्ष डॉलर कर्ज म्हणून आणि 100 दशलक्ष डॉलर अनुदान म्हणून दिले जाईल. या मदतीने राजधानी मालेला जवळील तीन बेटांना रस्त्याद्वारे जोडण्याचा प्रकल्प राबविला जाईल.
या मदतीतून भारत राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना त्यांची राजकीय मागणी पूर्ण करण्यास मदत करेल. हा प्रकल्प तेथील चार बेटांना जोडेल, ज्यामुळे आर्थिक घडामोडीदेखील वाढतील. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही दोन्ही देशांमधील कार्गो सेवा सुरळीत पद्धतीने चालू करण्याची घोषणा केली.
भारत आणि मालदीव यांच्यादरम्यान हवाई बबल तयार करण्यास सहमती दर्शविली आहे. शेजारच्या देशांसोबत ही पहिलीच व्यवस्था आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना मालदीवला भेट देण्याचा मार्ग मोकळा होईल. हे मालदीवच्या अर्थव्यवस्थेस मदत करेल. या योजनेचे प्रथम उड्डाण 18 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.