नवी दिल्ली -डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, कोरोना, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन अशा अनेक मुद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदींवर टीका केली आहे. भारतापेक्षाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने कोरोना परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.
भारताची ढासाळत चाललेली अर्थव्यवस्था आणि जीडीपीमधील घसरण यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चिंता व्यक्त केली आहे. या आर्थिक वर्षांत भारताच्या जीडीपी वृद्धीमध्ये 10 टक्के घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच भारताची वृद्धीही बांगलादेशापेक्षाही कमी राहणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावरून राहुल गांधींनी टीका केली आहे. टि्वटमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चार्ट शेअर केला आहे. यामध्ये भारताचा जीडीपी 10.30 टक्के तर अफगाणिस्तानचा 5 टक्के आणि पाकिस्तान उणे 0.40 टक्का वर्तवला आहे.