हैदराबाद -जगभरातील निर्वासितांच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी २० जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. निर्वासितांच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे सत्तर दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. हे लोक युद्ध, दहशतवाद, छळवणूक किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी आपले घरदार सोडून निघतात, आणि देशोधडीला लागतात. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये झालेल्या नोंदीनुसार वर्षभरात प्रत्येक मिनिटाला २५ लोक निर्वासित झाले होते.
निर्वासित दिनानिमित्त जगभरातील निर्वासितांच्या समस्या ओळखून, त्यांच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. जागतिक शरणार्थींचे हक्क, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रकाश टाकण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी जागतिक स्तरावर जागृती आणि कार्य होणे गरजेचे आहे. शरणार्थींच्या जीवनाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी जागतिक शरणार्थी दिनी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची मदत होते.
२० जून २००१रोजी पहिला निर्वासित दिन पाळण्यात आला होता. १९५१ च्या निर्वासितांसंबंधी झालेल्या अधिवेशनाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाचे अनावरण करण्यात आले. हा मूळ आफ्रिकन शरणार्थी दिन म्हणून ओळखला जात असे, मात्र २००० च्या डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय शरणार्थी दिन म्हणून मान्यता दिली.
प्रत्येक कृती मौल्यवान..
यावर्षी कोरोना महामारी, आणि जगभरात सुरू असलेल्या वर्णद्वेशाविरोधी आंदोलनांमुळे जगभरात समानता किती महत्त्वाची आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. एका अशा जगाची मागणी सगळीकडूनच केली जात आहे, जिथे कोणीही इतरांपेक्षा मागे पडत नाही. यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाने स्वतः पाऊल उचलणे गरजेचे आहे. यातूनच २०२०च्या निर्वासित दिनाची थीम समोर आली आहे, ती म्हणजे - एव्हरी अॅक्शन काऊंट्स! म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीने केलेली छोट्यातील छोटी कृतीदेखील बदल घडवण्यासाठी महत्त्वाची ठरते.
निर्वासितांबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?
⦁ प्रत्येक मिनिटाला जगातील सुमारे २० लोक निर्वासित होतात.
⦁ जगभरात ७९.५ दशलक्ष लोकांना नाईलाजाने निर्वासित व्हावे लागले आहे. यांमधील सुमारे ३० ते ३४ दशलक्ष निर्वासित हे १८ वर्षांपेक्षा लहान आहेत.
⦁ जगातील एक टक्के लोकसंख्या ही विस्थापित आहे.
⦁ जगातील विस्थापित लोकांपैकी ८०% लोक तीव्र अन्न असुरक्षितता आणि कुपोषणामुळे प्रभावित देशांमध्ये किंवा प्रदेशात आहेत.
⦁ विस्थापित झालेल्यांपैकी ७३% लोक हे त्यांच्या शेजारील देशांमध्ये आहेत