हैदराबाद - विविधतेने नटलेला, प्राचीन संस्कृतींची ओळख असलेला आणि सर्वांग सुंदर असा भारत देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. हेच निमित्त साधून, ईटीव्ही भारतने एका विशेष उपक्रम राबवत गांधीजींना श्रद्धांजली वाहत, देशातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.
गांधीजींच्या आवडत्या भजनांपैकी एक म्हणजे, "वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुख्खे उपकार करे तोये, मन अभिमान न आने रे..." हे आहे. या भजनामध्ये, प्रत्येकासाठी मनात करुणा असलेल्या एका वैष्णवाच्या जीवनाचे आणि त्याच्या आदर्शांचे अत्यंत सुंदर असे वर्णन करण्यात आले आहे. १५ व्या शतकातील गुजराती कवी नरसिंह मेहता, यांच्या भजनांद्वारे देशाला एकत्र जोडण्याची संकल्पना 'ईटीव्ही भारत'ने मांडली.
नरसिंह मेहता यांच्या साहित्यात आढळणारा साधेपणा, भक्ती, निर्भयपणा आणि निर्मळपणा बापूंनी आपल्या भजनांमध्ये उतरवला होता. त्यांच्या भजनांमुळे विविध जाती-धर्माचे आणि वेगवेगळ्या वर्गांतील लोक एकत्र आले होते. ही त्याकाळची गरजदेखील होती. अहिंसा आणि बंधुतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा गांधींची भजने लोकप्रिय झाली होती. लोक ही भजने आवडीने म्हणत. साबरमती आश्रमामध्ये तर एकत्रित भजन गायन हा दिनचर्येचाच भाग झाला होता.
हेही वाचा :गांधी @150 : रामोजी ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांनी लॉंच केले बापूंचे प्रिय भजन
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे आपण बालपणापासून रुजवत आलो आहे. प्राचीन संस्कृती, विविध परंपरा, वैविध्यपूर्ण खान-पान, वैचारिक स्वातंत्र्य असलेले लोक भारतात मिळून-मिसळून राहतात. 'ईटीव्ही भारत'देखील १३ भाषांमध्ये माहिती प्रसिद्ध करुन, भारतातील या विविधतेतील एकतेचे संवर्धन, जतन करण्याचा एक मौल्यवान प्रयोग केला आहे.