नवी दिल्ली - सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हफीज सईदचा गुरुग्राम येथील करोडोंचा बंगला जप्त केला आहे. हफीजचा फायनान्सर अहमद शाह वाटाली याने बंगला खरेदी केल्याचा संशय आहे. त्यामुळे हफीजच या बंगल्याचा मालक असल्याचा आरोप आहे. हफीज सईद २००८ ला मुंबईवर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा सूत्रधार आहे.
झहूर अहमद शाह वाटाली हा काश्मीरमधील उद्योजक असून तो हफीजचा फायनान्सर आहे. त्याने हफीजसाठी गुरुग्राममध्ये हा बंगला खरेदी केल्याचा आरोप आहे. वाटाली याला मागील वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या आरोपावरून अटक केली होती. या बंगल्यासाठी हफीजच्या पाकिस्तानातील फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन(एफआयएफ) या दहशतवादी संघटनेने पैसा पुरवला आहे. तसेच, हा पैसा संयुक्त अरब अमिरातीमार्गे (यूएई) हवालाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणण्यात आला होता, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.
ईडीने अवैध संपत्ती कलमांतर्गत चौकशी प्रकरणात ही मालमत्ता फेब्रुवारी महिन्यात ताब्यात घेतली आहे.'एनआयएने केलेल्या तपासाच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. आम्हाला पैसा कुठून आला, तो कसा गुंतवण्यात आला, याविषयी काही धागे-दोरे मिळाले आहेत. त्याआधारे गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. अशा अनेक मालमत्ता असून त्यात आलिशान बंगले, व्हिला, टोलेजंग इमारती यांचा समावेश आहे,' असे सूत्रांनी सांगितले.