वाराणसी - सध्या हिवाळ्याचे दिवस संपत असले तरी थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. वाढत्या थंडीने नागरिकच नव्हे तर, देवांनाही गारठवून टाकले आहे. उत्तरप्रदेश येथील प्रसिद्ध काशीमधील लोहटीया मधील गणेश मंदिरातील देवांना थंडीचा त्रास होऊ नये याकरता चक्क स्वेटर घालून देण्यात आले आहेत.
सध्या देशभरात थंडीची लाट आहे. पावसाचा अनियमित आणि अवकाळीपणामुळे थंडी जरा उशीरा सुरू झाली. असे असले तरी हिवाळ्याच्या शेवटी शेवटी थंडीचा जोर वाढायला लागला आहे. प्रत्येकजण थंडीपासून बचावाकरता उबदार कपड्यांचा वापर करतोय. मात्र, थंडी जर फक्त माणसांनाच वाटत असेल तर थांबा, उत्तरप्रदेशच्या एका मंदिरात देवांचाही थंडीपासून बचाव करण्याकरिता उबदार कपडे घातले जात आहेत.
वाराणसी येथील लोहटीया मधील गणपती मंदिरातील बाप्पांना येथील भाविकांनी थंडीपासून बचावाकरता स्वेटर, शॉल आणि ब्लँकेट, मफलरसारखे उबदार कपडे घातले आहेत. येथील भाविकांच्यानुसार जसे आपल्याला गर्मीत फॅन, कुलरची गरज भासते तसेच देवालाही गर्मीच्या वेळेस फॅन, कुलरची व्यवस्था करण्यात येते. त्याचपद्धतीने हिवाळ्यात थंडीपासून बचावाकरता देवाला आम्ही शॉल किंवा ब्लँकेट पांघरून देत असतो असे त्यांचे म्हणणे आहे.