महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली मार्च : किमान आधारभूत किमतींना हात लावणार नाही - केंद्रीय कृषीमंत्री

'किमान आधारभूत किमतींना हात लावणार नाही. त्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत', असे वक्तव्य केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत आपले मुद्दे मांडले. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 3, 2020, 8:13 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेली शेतकरी आणि कृषीमंत्र्यांची बैठक संपली असून बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. हरयाणा, उत्तरप्रदेश पंजाब राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला घेराव दिला आहे. सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

बैठकीनंतर काय म्हणाले कृषीमंत्री

'किमान आधारभूत किमतींना हात लावणार नाही. त्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत', असे वक्तव्य केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत आपले मुद्दे मांडले. कृषी कायदे रद्द करावेत ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. मात्र, यास केंद्र सरकार तयार नाही. यासोबतच शेतकऱ्यांच्या इतरही काही मागण्या आहेत. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, तोडगा निघाला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार आहे.

आत्तापर्यंत दोन बैठकी निष्फळ

याआधी मंगळवारीही शेतकरी नेत्यांनी केंद्रासोबत चर्चा झाली होती. या बैठकीतही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसोबतच आता ओडिशा आणि मध्य प्रदेशचे शेतकरीही दिल्लीकडे कूच करत आहेत. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडूंनी आंदोलनासाठी दिल्लीला जाण्याचा इशारा दिला आहे. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आज (गुरुवार) आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details