नवी दिल्ली - नुकताच राज्य सरकारने खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचा खर्च मर्यादित केला आहे. पण अनेक रुग्णालये आजही रुग्णांना दाखल होण्याआधी दर सांगत नाहीत. खासगी रुग्णालयांतून अनेक तक्रारी यायला लागल्या आहेत. ही रुग्णालये कोरोना रुग्णांचे फोन स्वीकारत नाहीत किंवा सुरुवातीचे डिपाॅझिट भरून दाखल व्हायला सांगतात. पण तज्ज्ञांच्या मते रुग्णाने काळजी करण्याची काही गरज नाही. कारण त्यातल्या बऱ्याच जणांना रुग्णालयात दाखल व्हायची गरज नसते आणि घरीच विलगीकरणात राहून त्यांच्यावर उपचार करता येऊ शकतो.
गेल्या काही दिवसांत ईटीव्ही भारतने दिल्लीतल्या काही रुग्णालयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यात मॅक्स, सर गंगाराम, बीएल कपूर आणि व्यंकटेश्वर रुग्णालय, अशी काही नावे होती. यांच्याशी बोलताना ते फोनवर काय म्हणाले हे जाणून घेण्यापेक्षा दिल्लीत कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दिल्लीतला कोरोना -
दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीत कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. दिल्लीत १,२२,७९३ कोरोना रुग्ण आहेत, तर ३,६२८ जणांचा कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिल्लीत अॅक्टिव्ह रुग्ण १६,०३१ आहेत. त्यापैकी ८,८१९ जणांना घरीच विलगीकरण करून ठेवले आहे. दिल्लीमध्ये सरकारी रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठीचे १२,००० बेड्स रिकामे आहेत.
काय आहेत खर्चाच्या मर्यादा?
कोरोनाची भीती प्रचंड होती, तेव्हा खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत होती. त्या दिवसात तर रुग्णालये कोरोना रुग्णांना दाखल करून घ्यायलाही तयार नव्हती. कुणी दाखल झालाच, तर दर लाखात असायचा. हे सर्व पाहिल्यानंतर सरकारने कोरोना रुग्णांचे वेगवेगळ्या श्रेणी करून उपचाराच्या खर्चावर मर्यादा आणली. रुग्णालये अधिसूचना दरापेक्षा जास्त दर आकारू शकत नाहीत. हे दर प्रत्येक दिवसाप्रमाणे आहेत.
- रुपये ८,००० ते रुपये १०,००० आयसोलेशन बेड
- रुपये १३,००० ते रुपये १५,००० व्हेन्टिलेशनशिवाय आयसीयू
- रुपये १५,००० ते रुपये १८,००० व्हेन्टिलेशनसह आयसीयू
(यात पीपीई किट्सचे दरही आहेत)
ईटीव्ही भारतने अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करण्याबद्दल चौकशी केली. तेव्हा सर गंगाराम रुग्णालय सोडले ,तर बाकी कुणीच सरळ उत्तरे दिली नाहीत.