नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कैद्यांना जामीन देण्यात आला आहे. मात्र, काही गुन्हेगारांना न्यायालयाने जामीन नाकारला आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने वडिलांच्या अंत्यविधीसाठी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपी तुरुंगाच्या बाहेर गेल्यानंतर अनेकांच्या संपर्कात येईल. पुन्हा तो तुरुंगात आल्यानंतर येथेही कैद्यांच्या संपर्कात येईल, यातून कोरोना संसर्ग होण्याचा मोठा धोका असे न्यायाधीश रजनीश भटनागर यांनी म्हटले.
आरोपी राकेश कुमार याचे घर दिल्लीपासून ८०० किमी दूर आहे. हा प्रवास आणि सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी बघता त्याचे तुरुंगातून बाहेर जाणे धोकादायक आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.