नवी दिल्ली -दिल्ली सरकारने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. यापैकी एका आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. उरलेल्या चारपैकी एकाने दयेसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज दिल्ली सरकारने फेटाळण्याची शिफारस केली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी शिफारस दिल्लीचे गृहमंत्री सत्येंदर जैन यांनी पत्रातून केली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार हत्या प्रकरण मानवतेचे सर्व दृष्टिकोनांतून हनन करणारे आहे. यात अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसवेल, अशी शिक्षा देणे आवश्यक आहे. याचिकाकर्त्याने केलेले कृत्य हा अत्यंत क्रौर्याचा आणि सर्वांत भयंकर गुन्हा आहे. तेव्हा या अपराध्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात अर्थ नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
राम सिंह, मुकेश सिंह, विनय शर्मा, मोहम्मद अफरोज, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर हे सहा जण या प्रकरणातील गुन्हेगार आहेत. यांच्यापैकी मोहम्मद अफरोज हा बाल गुन्हेगार असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. तर, मुख्य आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली. तर, उर्वरित गुन्हेगार तिहार तुरुंगात कैदेत आहेत. त्यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला होता.
निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी
२३ वर्षीय तरुणीसोबत १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील वसंत विहार परिसरात चालत्या बसमध्ये अमानुष सामूहिक बलात्कार झाला होता. यानंतर काही दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणीने अखेरचा श्वास घेतला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच, यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.