नवी दिल्ली - दिल्ली निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर अखेर २४ तासांनी आकडेवारी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २ टक्के मतदान जास्त झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली विधानसभेसाठी सरासरी ६२.५९ टक्के मतदान; 24 तासानंतर जाहीर केली आकडेवारी - दिल्ली निवडणूक आयोग
दिल्ली निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर अखेर २४ तासांनी आकडेवारी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले आहे.
'माहिती जमा करण्यास आम्हाला वेळ लागला, कारण अचूक माहिती देणे ही आमची प्राथमिकता होती. बल्लीरामन विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे ७१.५८ टक्के मतदान झाले. तर दिल्ली कन्टोन्मेंट क्षेत्रात सर्वात कमी(४५.३६) टक्के मतदान झाल्याचे दिल्ली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानी सांगितले.
निवडणूकीनंतर झालेल्या कल चाचण्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल, असे समोर आले आहे. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली. आकेडवारी जाहीर करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. निवडणूक आयोग काय करत आहे? किती लोकांनी मतदान केले, याची माहिती निवडणूक आयोग का जाहीर करत नाही? निवडणूक होऊन बराच काळ लोटला आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.