नवी दिल्ली - दिल्ली निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे प्रचारसभांमध्ये विवादित वक्तव्य करण्याचे प्रमाण वाढत आहे. भाजपच्या एका प्रचारसभेत केलेल्या अशाच घोषणाबाजीमुळे केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे वादात अडकले आहेत. दिल्ली निवडणूक आयोगाने या घटनेची नोंद घेतली आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे.
आतापर्यंत तक्रार दाखल नाही..
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी सांगितले, की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. मात्र, अजून कोणीही याबाबत तक्रार दाखल केली नाहीये. या प्रकरणी काँग्रेसने आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही टीका केली होती.
अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने मागवला अहवाल..
रिठाला मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ सोमवारी सभेचे आयोजन केले होते. या सभेला अनुराग ठाकुरही उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकांसोबत मिळून त्यांनी "देश के गद्दारों को, गोली मारो सालों को.." अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या. शाहीनबाग आणि देशभरात सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
हेही वाचा : आरएसएस ही भारतामधील दहशतवादी संघटना, डॉ. आंबेडकरांच्या पणतूचा हल्लाबोल