फनी चक्रीवादळ : ओडिशा किनारपट्टीला तडाखा बसण्याची शक्यता, आपत्तीनिवारण सज्ज - disaster
या वादळापासून बचाव करण्यासाठी गृहमंत्रालयाने १०८६ कोटी रुपये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालला त्यांच्या आपत्ती निवारण निधीमध्ये दिले आहेत. ओडिशाचा किनारा आणि पूरी जिल्ह्याला ३ मे रोजी वादळाचा तडाखा बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली - फनी चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ते ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर भयंकर चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि नैऋत्येकडे १६ किलोमीटर प्रतितास वेगाने सरकेल. यामुळे याचे मोठ्य़ा चक्रीवादळात रुपांतर होईल. पुढील ३६ तास हे वादळ आणखी भयानक होणार आहे.
'हे वादळ आणखी तीव्र होऊन १ मेपर्यंत वायव्येस सरकत राहील. त्यानंतर उत्तर आणि ईशान्येकडे ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करेल. यामुळे पुढील २४ तासांत केरळमध्ये मध्य प्रमाणात, तमिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे,' अशी माहिती आयएमडीने दिली आहे.
आयएमडीच्या बुलेटिननुसार, 'या वेळी वाऱ्याचा वेग १०० ते ११० किलोमीटर प्रतितासापर्यंत असून शकतो. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि नैऋत्येकडे तो १२५ किलोमीटर प्रतितासपर्यंतही जाऊ शकतो. तो हळूहळू वाढत जाऊन १२० ते १३० किलोमीटर प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. तसेच, आग्नेयेकडे १५० किलोमीटर प्रतिसास वेगाने घोंघावत जाणारे वारे वाहू शकतात. या काळात समुद्र खवळलेला राहील,' असे सांगण्यात आले होते.
श्रीलंका, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाला लागून असलेला समुद्र खवळलेला राहील. मोठमोठ्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रदेशांसह पुदुच्चेरी येथील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
गृहमंत्रालयाने दिली मदत
या वादळापासून बचाव करण्यासाठी गृहमंत्रालयाने १०८६ कोटी रुपये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालला त्यांच्या आपत्ती निवारण निधीमध्ये दिले आहेत.
शोध आणि बचाव कार्यासाठी ओडिशा डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्सला २० ग्रुप्सना आणि एनडीआरएफ जवानांच्या १२ युनिटसना अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती ओडिशाचे विशेष बचाव आयुक्त बिष्णूपाडा सेठी यांनी दिली.
ओडिशाचा किनारा आणि पूरी जिल्ह्याला ३ मे रोजी वादळाचा तडाखा बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.