पाटणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर यायला लागली आहेत. यात ऑनलाईन असणाऱ्या सराईत चोरांनी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनांवरूनच लोकांना लुटणे सुरू केले आहे.
ऑनलाईन बँकींग करताय, मग जरा जपून माहितीनुसार, केंद्र शासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये सर्व प्रकारच्या कर्जांवरील आकारण्यात येणाऱ्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांकरता थांबवण्यात आली आहे. मात्र, काही लोकांना या हप्त्यासंदर्भात दूरध्वनीवरून फोन येऊन त्यांची फसवणूक केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये, आधी सदर व्यक्तीस सायबर चोरटे हे एक लिंक पाठवतात त्यानंतर या लिकंला ओपन करण्यासाठी वापरण्यात येणारा ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड माहिती होताच ते त्या व्यक्तीच्या खात्यातील सर्व रक्कम उडवून टाकतात.
ओटीपीचा खेळ -
देशभरात फोन कॉलद्वारे सायबर क्राईमचे प्रकार उघडकीस येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे घरातून बाहेर पडणे बंद झाले आहे. यातच कुठल्याही प्रकारच्या देवाण-घेवाणसाठी नागरिक ऑनलाईन बँकिंग करत आहेत. घरात असल्यामुळे नेट सर्फिंगचा वापरदेखील वाढला आहे. नेमकी हिच संधी साधून हे चोरटे फेक वेबसाईट आणि फोनद्वारे लोकांना लुबाडण्याचे काम करत आहेत. हे चोरटे यूजरकडून ४ ते ६ अंकांचा ओटीपी मिळताच त्यांच्या खात्यातील रक्कम साफ करून टाकतात. अशा प्रकारच्या घटनांमध्ये, लकी ड्रा, एटीएम ब्लॉक किंवा व्हेरिफिकेशेनसारख्या गोष्टींवरून फोन किंवा लिंक पाठवून लोकांचे पैसे लुबाडले जात आहेत. बिहारमध्ये असे प्रकार घडण्याचे प्रमाण इतक्यात वाढले आहे. इतकेच नव्हे तर सामान्य नागरिकांसोबतच पोलिसांनाही या गुन्हेगारांनी लुबाडले आहे. सारण येथे एक निवृत्त झालेल्या ठाणेदारालादेखील अशाचप्रकारे लुबाडले गेले. तर. पटनामध्येही सायबर क्राईमचे असे अनेक प्रकार समोर आले आहेत.
बँक कधीही ग्राहकाला ओटीपी विचारत नाही -
शहराच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एजीएम दिनेश कुमार सिंह म्हणाले, रिझर्व बँक ऑफ इंडियापासून तर इतर सर्व बँकांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार कुणीही व्यक्ती तुम्हाला तुमच्या ऑनलाईन बँकींगसंदर्भात किंवा एटीएम संदर्भात ओटीपी मागत असल्यास त्याला देऊ नये, बँक कधीच कुठल्याही ग्राहकाला फोन करून ओटीपी मागत नाही आणि खबरदारी म्हणून वेळोवेळी त्यासंदर्भात संदेश पाठवून ग्राहकांना सुचनाही दिल्या जातात.
सायबर क्राइमवर आळा घालण्याकरता बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक प्रान्तोष कुमार दास म्हणाले, बिहारमध्ये सायबर गुन्हे थांबवण्याकरता २ हजार २०० पोलिसांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. त्यासाठी केंद्राकडून निधीही देण्यात आला होता. त्यानुसार आम्ही सर्वांना ट्रेनिंग दिली. याबोसतच नागरिक शासनाच्या ज्या पोर्टलवर सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार दाखल करतात त्या पोर्टलसोबत बिहार पोलिसांचे ऑनलाईन पोर्टलही लिंक आहे. cybercrime.gov.in नावाच्या या पोर्टलवर नागरिकांनी एखादी तक्रार नोंदवताच आम्हाला त्याबाबद सूचना केल्या जातात. त्यानुसार आम्ही कारवाई करतो आणि वेळोवेळी शासनाला याबाबत सूचनाही देत असतो, असे प्रान्तोष म्हणाले. सध्यास्थितीत सायबर गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या ऑनलाईन बँकींग किंवा सर्फिंगबाबत कुठलीही माहिती कुणाला मिळणार नाही याबाबत खबरदारी बाळगावी, असेही ते यावेळी म्हणाले.