चेन्नई(कडलूर) - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारी मुलभूत साधनेच उपलब्ध होत नाही. याच कारणातून कडलूर जिल्ह्यातील परुती गावात एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केली.
विघ्नेश असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. विघ्नेशचे वडील विजय कुमार हे काजू विक्रेते आहेत. आपल्या इतर मित्रांप्रमाणे आपल्यालाही ऑनलाईन अभ्यासासाठी स्मार्टफोन हवा असल्याची मागणी विघ्नेशने विडिलांकडे केली होती. काजू विक्रीतून पैसे जमा झाल्यानंतर फोन घेऊन देण्याचे आश्वासन त्याच्या वडिलांनी दिले होते.