महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CSIR स्थापना दिन: दुग्धजन्य पदार्थ, एड्सच्या औषधींपासून स्वदेशी टॅक्टर - कॉम्प्यूटरचा 'आविष्कार' करणारी भारतीय संस्था

भारताने आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीत उंच झेप घेतली आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विज्ञान तंत्रज्ञानात भारत मागासलेला होता. मात्र, सीएसआयआरच्या नवनव्या संशोधन आणि अविष्कारांमुळे आज आपल्याला चांगले दिवस पहायला मिळाले आहेत. आज सीएसआयआरचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत.

CSIR
सीएसआयआर

By

Published : Sep 26, 2020, 6:07 AM IST

नवी दिल्ली- 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद' म्हणजेच सीएसआयआर या संशोधन संस्थेची स्थापना २६ सप्टेंबर १९४२ रोजी झाली. आज ही संस्था ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन अविष्कार आणि संशोधन करण्यास सीएसआयआरचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत भारत चाचपडत असताना सीएसआयआरने भारताच्या प्रगतीला दिशा देण्याचं काम केलं.

सध्या देशभरात सीएसआयआरच्या ३८ प्रयोगशाळा असून ३९ प्रादेशिक केंद्रे आहेत. याशिवाय देशात ३ इनोव्हेशन(अविष्कार) कॉम्पलेक्स उभारण्यात आले आहेत. सीएसआयआरमध्ये तब्बल ४ हजार ६०० वैज्ञानिक विविध क्षेत्रात रात्रंदिवस संशोधन करत आहेत.

कोणकोणत्या क्षेत्रात सीएसआयआर करतेय संशोधन

रेडिओ, अवकाश, भौतिकशास्त्र, सागरी विज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायने, औषधे, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, खाणक्षेत्र, एरॉनॉटिक्स, इस्ट्रुमेंन्टेशन, पर्यावरण आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात नवनवीन शोध आणि अविष्कार करत आहे. यासोबत नागरिकांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी सीएसआयआर प्रयत्नशील आहे. पर्यावरण, आरोग्य, पिण्याचे पाणी, घरे, उर्जा आणि शेतीच्या विकासासाठी सीएसआयआर काम करत आहे. वरील क्षेत्रांमध्ये संस्थेने केलेली अनेक संशोधने भारताच्या विकासास हातभार लावणारी ठरली आहेत.

बौद्धिक संपदा चळवळीची मूहुर्तमेढ

भारताच्या बौद्धिक संपदा चळवळीही मूहुर्तमेढ सीएसआयआरने रोवली. विविध क्षेत्रातील संशोधनांचे पेटंट घेण्यासाठीही संस्थेचे काम सुरू आहे. दरवर्षी सीएसआयआर २०० पेक्षा जास्त भारतीय आणि २५० पेक्षा जास्त परदेशी पेटंटसाठी अर्ज करते. एखाद्या क्षेत्रात नवे संशोधन केल्यास त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी पेटंट गरजेचे ठरते. त्यातून इतरांना हे तंत्रज्ञान मोफत वापरता येत नाही. त्यामुळे अनेक देश आणि मोठ्या कंपन्या विविध क्षेत्रात पेटंट मिळविण्याचा प्रयत्न करतात. सीएसआयआरमुळे भारताला अनेक क्षेत्रात नवनवे पेटंट मिळाले आहेत. त्याचा भारताने व्यावसायिक वापरही केला आहे.

भारताच्या एकूण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात सीएसआयआरचा वाटा १० टक्के आहे. २०१२ आणि २०१३ साली सीएसआयआरने ५ हजारांपेक्षा जास्त वैज्ञानिक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध केले होते. जागतिक स्तरावर यातील अनेक संशोधने नावाजली होती. देशात उद्योजकतेला चालना मिळण्यासाठीही सीएसआयआर प्रयत्नशील आहे.

जगभरातील ४ हजार ८५१ नामांकित संशोधन संस्थामध्ये सीसएआयआरचा ८४ वा क्रमांक लागतो. १०० प्रमुख जागतिक संशोधन संस्थामध्ये फक्त या एकट्या भारतीय संस्थेचा समावेश आहे. २०१४ च्या Scimago क्रमवारीनुसार सीएसआयआरचा आशिया खंडातील देशांत १७ वा क्रमांक आहे.

शांती स्वरूप भटनागर पहिले संचालक

सीएसआयआरची स्थापना झाल्यानंतर शांती स्वरूप भटनागर हे पहिले संचालक बनले. स्वातंत्र्यानंतर देशात विज्ञान तंत्रज्ञान धोरणे ठरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात देशात १२ संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते पहिले चेअरमन होते. १९५४ साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

सीएसआयआरच्या संशोधनातील मैलाचा दगड

अमूल मिल्क फूड -

१९७० च्या काळात दुधापासून तयार करण्यात येणारे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात परदेशातून मागविण्यात येत होते. भारतात उत्पादन सुविधा निर्माण करण्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नकार दिला. भारतात गायींचे दुध पुरेशा प्रमाणात नसून म्हशीच्या दुधाची फॅट जास्त असल्याचे कारण देत भारताची मागणी या कंपन्यांनी धुडकाऊन लावली होती. त्यानंतर सीएसआयआरने म्हशीच्या दुधापासून पदार्थ तयार करण्यासाठी संशोधन करण्यास सुरुवात केली. लहान मुलांना सहज पचेल असे पदार्थ तयार करण्याजोगे तंत्रज्ञान सीएसआयआरने विकसित केले.

एचआयव्ही एड्सचा सामना

जगभरात एड्सचे सुमारे दोन कोटी रुग्ण आहेत. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात औषधे लागतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या यातून कोट्यवधी पैसे कमावत होत्या. मात्र, सीएसआयआरने नवे तंत्रज्ञान शोधून कमी पैशात एड्सवर औषधे तयार केली. तसेच हे तंत्रज्ञान भारतीय औषध निर्माण कंपनी सिप्लाकडे हस्तांतरीत केले. त्यामुळे कमी पैशात हे औषध तयार होऊ शकले. भारताच्या या प्रयत्नामुळे नाईलाजास्तव बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपन्यांना एड्सच्या औषधांच्या किमती कमी कराव्या लागल्या. भारताने ही औषधे गरीब देशांनाही पुरविली.

स्वदेशी सुपर कॉम्प्युटर - 'क्रोधित भारतीयांनी करुन दाखवलं'

१९८० च्या दशकात भारतात कॉम्प्युटर क्षेत्रातील तंत्रज्ञान दुर्मिळ होते. सुपर कॉम्प्युटर तर दुरची गोष्ट होती. त्यामुळे भारताला दुसऱ्या देशांकडून एकतर जास्त किंमतीत तो विकत घ्यावा लागत असे किंवा कोणी देण्यास तयार नसे. त्यानंतर सीएसआयआरने सुपर कॉम्प्युटर तयार करण्याचा विडा उचलला. १९८६ साली भारताला 'परम' हे सुपर कॉम्प्युटर तयार करण्यात यश आले. जगाने भारताला कॉम्प्युटर तंत्रज्ञान नाकारले, मात्र, भारताने स्वतःच्या हिंमतीवर तंत्रज्ञान विकसित केले. 'क्रोधित भारतीयांनी करुन दाखवलं' अशा आशयाचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टने त्यावेळी दिले होते.

स्वराज ट्रॅक्टर संशोधन

स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी भारतीयांची भूक भागवण्याचं आव्हान सरकारपुढे होते. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अभाव होता. हरित क्रांती देशात होत होती. मात्र, त्यासाठी मनुष्यबळासह तंत्रज्ञानाचीही गरज होती. सीएसआयरने भारताची कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची गरज भागविण्यासाठी २० हॉर्स पॉवरचा स्वदेशी ट्रॅक्टर तयार केला. १९७४ साली देशात स्वदेशी ट्रॅक्टर विक्री सुरू झाली. त्यामुळे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्यानंतरही सीएसआयआरने कृषी क्षेत्रातील संशोधन सुरूच ठेवले.

ABOUT THE AUTHOR

...view details