श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील युवकांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी सीआरपीएफने 'काविश' हा टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाद्वारे युवकांमधील विविध सुप्त गुणांचा शोध घेवून त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करुण देणे हा उद्देश आहे.
सीआरपीएफचे आयजी झुल्फीकार हसन यांनी याविषयी बोलताना सांगितले, की काश्मीरमधील युवकांमध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरपूर प्रतिभा आहे. याचा शोध घेण्यासाठी आम्ही श्रीनगरमधून सुरुवात केली आहे. याद्वारे युवकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. सध्या आम्ही श्रीनगरमध्ये सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करणार आहोत. याद्वारे प्रतिभावान युवकांचा शोध घेवून त्यांचासाठी एक अंतिम सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यातील विजेत्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
सीआरपीएफचा काविश कार्यक्रम सीआरपीएफच्या या उपक्रमाची प्रशंसा ऑडिशन देण्यासाठी आलेल्या युवकांनी केली आहे. कार्यक्रमात भाग घेणारा पंडित ओवैस म्हणाला, सीआरपीएफसोबत जर सरकारनेही आम्हाला सहकार्य केल्यास खूप चांगली परिस्थिती निर्माण होईल. सरकारच्या मदतीशिवाय मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांचे आयोजन शक्य नाही. काश्मीरमधील युवकांना अशा कार्यक्रमांची गरज आहे. तर, नासीर अली खान म्हणाला, काश्मीरच्या घाटात राहणाऱया युवकांसाठी असे कार्यक्रम मानसिक ताण हलका करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे कार्यक्रम आमचा ताण हलका करत असून प्रतिभेला नवीन चालना देत आहेत.
कार्यक्रम आयोजित करणारे रॉयल काश्मीर इव्हेंटचा मॅनेजर याबद्दल बोलताना म्हणाले, काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत. येथील युवकांना मंच मिळत नव्हता. येथे सर्वत्र प्रतिभा आहे. परंतु, ती दाखवण्यासाठी जागा नव्हती. कार्यक्रमासाठी पूर्ण काश्मीरमधून नोंदणी होत असून आम्हांला चांगला प्रतिसाद मिळत आहे.