नवी दिल्ली- दिल्लीमध्ये आज (रविवारी) सकाळी अक्षरधाम मंदिराजवळ पोलीस आणि गुंडांच्या टोळक्यामध्ये चकमक झाली. सकाळी ११ च्या दरम्यान दिल्ली पोलिसांच्या गाडीवर कारमधून आलेल्या चार गुंडांनी गोळीबार केला. त्यामुळे भर गर्दीच्या वेळी शहरामध्ये दहशत निर्माण झाली होती.
अक्षरधाम मंदिराजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी कारमधील चौघांना थांबण्यास सांगितले, त्यावेळी कारमधील गुंडांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी ही प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला. त्यानंतर गुंड गीता कॉलीनीच्या दिशेने कारमधून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र, फरार होण्यात सर्वजण यशस्वी झाले. पोलीस आता मार्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. गोळीबार करुन फरार झालेली गुंडांची टोळी लुटमारीच्या प्रकरणांमध्येही सहभागी असल्याचे समोर आले आहे. हे टोळके मेट्रो स्टेशनच्या बाहेर नागरिकांना कमी दरामध्ये कॅब सेवा पुरण्याचे आमिष दाखवतात. नंतर कॅबमध्ये बसल्यावर प्रवाशांची लुटमार करतात, अशी माहिती दिल्ली पूर्व विभागाचे पोलीस अधिक्षक जसमीत सिंह यांनी दिली. पोलीस या टोळक्याचा शोध घेत आहे.