महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

देशात मागील २४ तासांत ६७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ३८ टक्के म्हणजे २५६ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. तर त्याखालोखाल दिल्लीत ६६ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Nov 7, 2020, 6:18 AM IST

हैदराबाद - देशात मागील २४ तासांत ६७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ३८ टक्के म्हणजेच २५६ मृत्यू महाराष्ट्रात झाले. त्याखालोखाल दिल्लीत ६६ जणांचा मृत्यू झाला. देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ८६ टक्के कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोना अपडेट

परदेशातून आलेल्या विमानप्रवाशांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणीच्या रिपोर्ट शिवाय येता येणार आहे. प्रवाशांनी विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणी केली तर त्यांना 'इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन'मधूनही सुट मिळणार आहे.

दिल्ली -

दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी मास्क घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या प्रकारे नागरिकांनी कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा सामना केला, तसेच आता तिसऱ्या लाटेचाही ते सामना करतील. जो पर्यंत कोरोनावर लस नाही तोपर्यंत मास्क हीच कोरोनावरील लस आहे. सर्वांनी मास्क घालावे यासाठी अभियान राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र-

राज्यात काल (शुक्रवारी) ११, ०६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५, ०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाक ६२ हजार ३४२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ हजार ९६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख १८ हजार ५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १० हजार ३१४ (१८.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५९ हजार ४९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ८ हजार ८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख २ हजार ९९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कर्नाटक -

कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रदुषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. फटाक्यांवर बंदी घालण्यासंबंधी आम्ही चर्चा केली असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले. प्रदुषणामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे.

उत्तराखंड -

राज्यातील पुरी जिल्ह्यातील पाच विभागांतील ८० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ८४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळेतील शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्याचे आदेश राज्याचे आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिले आहेत. १३ जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

आंध्रप्रदेश -

कोरोना काळात जे विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेले असतील किंवा अद्यापही असतील त्यांच्यासाठी राज्य सरकार समूपदेशन सुरू करणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम हा जागतिक स्तरावरील चर्चेचा विषय ठरला आहे. या कठीण काळात शाळा विद्यालये बंद असताना विद्यार्थ्यांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details